देवगड/प्रतिनिधी
कुणकेश्वर सागरीमार्गावरील पुलावर गरीने मासेमारी करण्यासाठी केलेली गर्दी
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत राज्यामध्ये १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसाच्या कालावधी समुद्रातील मासेमारीला बंदी असते. त्यामुळे या कालावधीत खाडीतील व गोड्या पाण्यातील मासेमारीवर मच्छिमारांचा उदरनिर्वाह सुरू असतो. या दोन महिन्यात गरीने मासेमारी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समुद्राच्या मुखाशी असलेल्या पुलावरून गरीने मासेमारी करणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
माशांच्या प्रजननाला अवधी मिळावा यासाठी राज्य शासनाने 61 दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी घातला आहे. या दिवसात समुद्रातील मासेमारी पूर्णतः बंद असते. सर्व लहान मोठ्या नौका समुद्रकिनाऱ्यावर शाकारून ठेवल्या जातात. त्यामुळे मासेमारी बंद असल्याने मत्स्य खवय्याना गोड्या पाण्यातील व खाडी किनाऱ्यात भागातील मासेमारीवर अवलंबून राहावे लागते. गावागावांमधील गोड्या पाण्याच्या नदीमध्ये, तलावांमध्ये तसेच खाडी पाण्यात मासेमारी करताना अनेक मच्छीमार दिसून येतात. सध्या कुणकेश्वर समुद्रकिनारी मार्गावर नवीन पूल झाल्यामुळे यावर्षी मासेमारी करणाऱ्या तरुणांना मासेमारी करण्यासाठी नवीन जागा उपलब्ध झाली आहे त्यामुळे पुलावरती मासे पकडणार यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
मासेमारी बंदी कालावधीमध्ये खाडी व गोड्या पाण्यातील मासेमारी बरोबरच तिसरे मुळे, कालवं, खेकडे यांनाही मोठी मागणी असते.





