देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी देवगड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
देवगड (प्रतिनिधी)
नाशिक येथील काळाराम मंदिर प्रकरणी प्रसिद्ध झालेल्या पत्रातील आशयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजात तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहेत. या प्रकरणातील संशयीतांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी देवगड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे. नाशिक येथील काळाराम मंदिराबाबत काही दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातील समाजात तेढ निर्माण करीत असणाऱ्या व्यक्ती व संघटनावर कारवाई करण्यात यावी. याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देण्यात आले आहे. हे निवेदन गुरुवारी देवगड तहसीलदार संकेत यमकर व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघांचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, एस. एस. मुंबरकर, विजय कदम, अनिल पुरळकर, किशोर कांबळे, के. एस. कदम, आनंद देवगडकर, राजेंद्र मुंबरकर, अशोक जाधव, उत्तम कांबळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रभाकर साळसकर, समीर शिरगांवकर, सागर जाधव, सुमित जाधव, नितेश जाधव, अनिकेत मिठबावकर, अस्मित कदम, आतिष शिरगांवकर, रत्नदिप कांबळे, पार्थ कदम, मोहनीश मुंबरकर, अमोल मिठबावकर, दिलीप वाडेकर, संतोष साळस्कर आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यमकर व पोलीस निरीक्षक यांनी निवेदन शासनाकडे सादर करण्यात येईल असे सांगितले.