योग शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यामध्ये सकारात्मक परिवर्तन करतो. – अपर्णा पवार
बांदा : – (प्रतिनिधी)
योग हे प्राचीन शास्त्र आहे. योगामुळे शरीर व मन एकमेकांशी जोडले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक बौद्धिक आणि भावनिक व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. योगासनामुळे व्यक्ती दीर्घकाळ स्वस्थ आणि निरोगी राहते. एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन योग प्रशिक्षक अपर्णा पवार यांनी केले. येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग प्रशिक्षक अपर्णा पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. अपर्णा पवार यांनी विविध प्रात्यक्षिकाद्वारे योगासनांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दत्तगुरु जोशी होते. मन आणि शरीर यांचा सुसंवाद साधण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगी जीवनाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रसार करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाने महत्त्वाचे मानले. म्हणूनच २१ जून २०१४ पासून दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. असे प्रतिपादन अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी कार्यक्रमाधिकारी डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. टी. न्हावेलकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.