वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने टेम्पो रस्त्यावर उभा केल्याप्रकरणी वाहन चालकांवर कारवाई ; तळेबाजार येथील घटना
देवगड (प्रतिनिधी)
तळेबाजार बाजारपेठेतील रस्त्यावर विरुद्ध दिशेस महिंद्रा जीतो टेम्पो उभा करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी मनोजकुमार बुधाजी चौकेकर (३४, रा. वरवडे फणसवाडी, ता. कणकवली) या चालकावर देवगड पोलिसांनी केली आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी १ वा. च्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मनोजकुमार चौकेकर याने आपल्या ताब्यातील महिंद्रा जीतो टेम्पो तळेबाजार बाजारपेठेत नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर विरुद्ध दिशेने उभा करून ठेवला होता. या टेम्पोचा इतर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याचदरम्यान देवगड पोलीस हवालदार प्रवीण सावंत, राजन जाधव, कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर हे तेथून गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी चालक मनोजकुमार चौकेकर याच्यावर कारवाई केली. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून संशयित चालक मनोजकुमार चौकेकर याच्याविरुद्ध भादंवि कलम २८३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. घटनेचा तपास हवालदार राजन जाधव करीत आहेत.