महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी राज ठाकरे कणकवलीत - विनायक राऊत
राज ठाकरे यांनी बारसू व नाणारवासीयांची माफी मागावी
कणकवली दि .5( प्रतिनिधी)
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी राज ठाकरे हे कणकवलीत आले होते. राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी घेतलेल्या कणकवलीतील सभेत रिफायनरीचे दलाल व्यासपीठावर उपस्थितीत होते, अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. राऊत बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव-सावंत, संकेत नाईक, राजू
राठोड. सचिन सावंत. सी. आर. चव्हाण, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.
रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली बारसू व नाणार गावात विनायक राऊत यांनी एक इंच देखील जमीन खरेदी केल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरव्यानिशी सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास राज यांनी बारसू व नाणार गावात जाऊन ग्रामस्थांची जाहीररित्या माफी मागावी, असे आव्हान रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांना दिले.
नारायण राणें जिल्ह्यात आमुलाग्र बदल केल्याचे सांगत आहेत. मात्र, जिल्ह्यात त्यांनी एक तरी उद्योग सुरु केला आहे का? कुडाळ एमआयडीतील भूखंड राणेंच्या समर्थकांनी खरेदी केले आहेत. राणे हे महसूलमंत्री असताना जिल्ह्यात वनसंज्ञाखाली असलेली 420 हेक्टर जमीन 4200 हेक्टर करून टाकण्याचे पाप त्यांनी केले आहे, असा आरोप राऊतांना केला.
राणेंनी स्वतःचे पडवे येथे मेडिकल कॉलेज सुरु करून याठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली आहे.नारायण राणे यांचे राजकीय जहाज बुडायला लागले असून या जहाजाला आधार देण्यासाठी राज हे कणकवली आले होते. राणेंच्या प्रचारार्थ राज यांनी कणकवली सभा घेतली. या सभेत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माझ्या विरोधात गरळ ओकली. ही गरळ ओकण्याची स्क्रीप्ट राणेंनी राज यांना लिहून दिली होती. असेही राऊत म्हणाले.
नारायण राणे हे लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री आहेत. या खात्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले लाभार्थी हे राणे आहेत. केंद्र सरकारमध्ये त्यांना वजनदार खाते मिळाले. मात्र, अडिच वर्षांत सिंधुदुर्गात एकही रोजगाराचा प्रकल्प ते आणू शकले नाहीत. राणेंनी आजवर भूषविल्या मंत्रीपदाचा वापर स्वार्थासाठी करून आपल्या कुटुंबाचा विकास करत जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप राऊत यांनी केला.





