जनतेला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार हवा की केंद्रात मंत्री म्हणून काम करणारा खासदार हवा हे ठरवा – राज ठाकरे

21

जनतेला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार हवा की केंद्रात मंत्री म्हणून काम करणारा खासदार हवा हे ठरवा – राज ठाकरे

मोदींच्या मंत्रिमंडळात राणे मंत्री असतील.आणि इथल्या प्रत्येक तरूणाच्या हाताला काम मिळेल.

खासदार विनायक राऊत यांनी केवळ प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे कोकणचा विकास थांबला

कणकवली (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग – रत्नागिरी मधील
जनतेला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार हवा की केंद्रात मंत्री म्हणून काम करणारा खासदार हवा हे ठरवा. मोदींच्या मंत्रिमंडळात राणे मंत्री असतील.आणि इथल्या प्रत्येक तरूणाच्या हाताला काम मिळेल.आणि आपल्या मतदार संघाचा सर्वांगीण विकास होईल.असा विश्वास मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

कणकवली येथील नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर‌ केंद्रीयमंत्री तथा महाविकास आघाडीचे‌ उमेदवार नारायण राणे, आमदार नितेश राणे,मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश जाधव ,खा. चंद्रकांत अडसूळ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे ‌आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,प्रकल्पाच्या नावे जमिनींमध्ये दलाली करायचे हे अडीच वर्षे राहिलेल्या मागील सरकारचे उद्योग राहिले. तर खासदार राऊत यांनी केवळ प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे कोकणचा विकास थांबला. अशी टीका त्यांनी केली.

आजवर कोकणात उद्योग आला की ठाकरेंचा खासदार त्याला विरोध करणार? प्रत्येक प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरविणार यामुळे इथला विकास थांबला आहे. इथल्या खासदारांनी आजपर्यंत जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत चुकीची माहिती दिली. स्फोट झाला तर काय होईल अशी भीती निर्माण केली. पण आज भारतात गुजरात, मद्रास, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तारापूर, तामिळनाडू एवढे अणुउर्जा प्रकल्प भारतात आहेत. भाभा अणु उर्जा केंद्र मुंबईत आहे. तिथे कधी हे केंद्र काढून टाका अशी मागणी कधी झाली नाही. पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही ही भूमिका इथल्या खासदाराची राहिली.अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

ठाकरे म्हणाले, इथला प्रदेश सर्वांग सुंदर आहे. जगात दुसऱ्या क्रमाकाचा जैवविविधता असलेला देश आहे. इथे हॉटेल्स उभी रहायला हवीत. इथे पर्यटन उद्योगाला प्रचंड वाव आहे. राणे हे केंद्रात पुन्हा मंत्री झाले तर इथल्या तरूणांना कोकणच्या बाहेर जाण्याची गरज नाही. इथेच मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

माझ्या प्रचार सभेची नारायण राणेंना गरजच नाहीय ते निवडून आलेले आहेत. केवळ 6 महिने मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी झपाटलेल्या सारखी विकासकामे केली. जर 5 वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले असते तर आज राणेंच्या प्रचाराची गरजच नव्हती. अभ्यासू नेता म्हणून राणेंची ओळख आहे.

महाराष्ट्र राज्याला 9 भारतरत्न आहेत, त्यातील 7 भारतरत्न ही कोकणातील आहेत. कोकणी जनता ही सुजाण आणि सुज्ञ आहे. मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिली जाहीर सभा आहे. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट नाही पटली तर नाही, पटली ते पटली. 2014, 2019 वेळी मोदींच्या काही गोष्टी मला नाही पटल्या. त्या आजही नाही पटत. आज विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मी पाठिंबा दिला. काश्मीर मधील रद्द केलेले 370 कलम, अयोध्येत कार सेवकांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले, त्यांची प्रेते शरयू नदीत फेकण्यात आली तेव्हापासून राम मंदिर प्रश्न भिजत पडला होता आणि आता नरेंद्र मोदींचे सरकार असताना कोर्टाकडून राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली. आज नरेंद्र मोदी सरकारमुळे राम मंदिर उभे राहिले. अन्यथा राम मंदिर अशक्य होते.

मित्राची खरडपट्टी काढताना आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे असता नये. असेही त्यांनी सांगितले.