कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्यांना ८ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी…!

कुडाळ : कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना बुधवार दि. ८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

कुडाळ पोलिसांनी ४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलीसांनी शनिवारी कुडाळचे नायब तहसीलदार अभिजित हजारे व आंब्रड तलाठी नवीन राठोड यांना मारहाण करणारे आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकीत नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई व जागृत परब या सर्वाना अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी या ७ ही आरोपींना दोन दिवसांची म्हणजेच सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. आज सोमवारी पुन्हा ७ ही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी बुधवार दि. ८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी रात्री कुडाळचे नायब तहसीलदारासह आंब्रड तलाठयाला अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर  व्यावसायिकांकडून मारहाण झाली होती. तर या प्रकरणातील ४ डंपर व इनोव्हा कार, मोबाईल, मोटारसायकल पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंदरकर व पोलीस मनोज पाटील हे तपास करीत आहेत.