भाजपच्या आनंद मेळाव्यात सर्वसामान्यांना राक्षसी वृत्तीचे दर्शन घडले : हरी खोबरेकर

आई भराडी विविध रूपांनी या वृत्तीचा बिमोड करेल…!

मालवण : आंगणेवाडीच्या यात्रेच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने आनंद मेळावा घेण्यात आला खरा मात्र हा मेळावा यात्रेला आलेल्या भाविकांना, जनतेला, ज्येष्ठांसाठी तो वेदनादायी आणि कष्टदायी ठरला. या मेळाव्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांना दोन- दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली. या मेळाव्यातून जिल्ह्यासाठी ठोस काहीतरी मिळेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करून आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून भाजपने राक्षसी वृत्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे आई भराडीच कोणत्या ना कोणत्या रूपाने या राक्षसी वृत्तीचा येत्या काळात बिमोड करेल, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकातून केली आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून भाजपच्या वतीने काल आनंद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर झालेल्या टीकेचा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. या मेळाव्यात भाजपाच्या नेत्यांची जी भाषणे होत होती त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपण काय देणार यावर भाष्य होणे अपेक्षित होते. पण या भाषणातून कोकणच्या नेत्यांचा क्रूरपणा, राक्षसी वृत्ती दिसून आली.

यात्रेला आल्यावर सर्वजण राजकीय पादत्राणे बाहेर ठेवतात, हा इतिहास आहे. परंतु या मेळाव्याचे राजकारण करण्यात आले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसा करता येईल यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु विरोधकांना कसे अडचणीत आणता येईल, याचाच प्रयत्न या ठिकाणी झाला. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांना जाहीर व्यासपीठावरून धमक्या दिल्या गेल्या आणि हे प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घडत होते. यावरून भाजपच्या राजवटीत सर्वसामान्य जनता किती सुरक्षित आहे, याचा प्रत्यय दिसून आला. मंत्रीच जर अशा धमक्या देत असतील तर हे कितपत योग्य आहे याचा सर्वसामान्य जनतेने विचार करण्याची गरज आहे.

या मेळाव्याला आणलेल्या अतिरिक्त गर्दीमुळे पोलीस प्रशासनावर ताण आला. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामुळे अनेक जण आंगणेवाडी नजीक येऊन देवीच्या दर्शनापासून वंचित राहिले. स्वतःच्या भक्तांचे झालेले हाल आई भराडी देवी कधीही सहन करणार नाही. त्यामुळे या राक्षसी वृत्तीचा भराडी देवी चोख बंदोबस्त निश्चितच करेल असा आपल्याला विश्वास असल्याचेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.