सातार्डे महात्मा गांधी प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला पार पडला
बांदा (मंगल कामत)दि २० फेब्रुवारी २०२४
प्राथमिक शिक्षण हाच खरा आयुष्याचा पाया आहे. जर पाया मजबूत असेल तर इमारत चांगली उभी राहते. त्यामुळे आपला शैक्षणिक पाया मजबूत करा. शिस्त, आदर, दूरदृष्टी, हुशारी, कार्यक्षमता ज्याच्या अंगी असतात, ते नेहमीच पुढे जातात. या वयातच चांगली स्वप्ने पाहा. आदर्शाची प्रेरणा घेऊन यशाची शिखरे सर करा, असे प्रतिपादन पत्रकार उपसंपादक प्रवीण मांजरेकर यांनी येथे केले.
सातार्डा महात्मा गांधी प्रायमरी स्कूलच्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलनाचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मांजरेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातार्डा मध्यवर्ती संघ मुंबईचे चेअरमन अनिल तळवणेकर हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव राजाराम आरोंदेकर, महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर, सातरडा सरपंच बाळू प्रभू, माजी सरपंच उदय परिपत्ये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर, स्कूल कमिटी चेअरमन उमेश मांजरेकर, प्रायमरी स्कूल चेअरमन बाळकृष्ण बेर्डे, पालक शिक्षक संघ अध्यक्ष संदेश कवठनकर, प्रशांत पुनाळेकर, सुधा कवठनकर, संतोष कांबळी, योगेश गोवेकर, प्रायमरी स्कूल मुख्याध्यापक संज्योती पेडणेकर, हायस्कूल मुख्याध्यापक सावंत, कुंदे, हळदणकर आदी उपस्थित होते.
त्यावेळी प्रा. सौ . मांजरेकर म्हणाल्या, खेळाने शरीर सुदृढ होते तर अभ्यासाने बुध्दीचा विकास होतो.दोन्हीच्या विकासातून चांगले व्यक्तिमत्त्व घडते.यासाठी जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक उपक्रमानही प्राधान्य द्या, असे सांगितले . चेअरमन तळवणेकर यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले.त्यावेळी आदर्श शिक्षीका प्रा. सुषमा मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. वर्षभरातील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेअरमन बाळकृष्ण बेर्डे यांनी केले.





