मुख्यमंत्री शिंदे जिल्ह्याला नक्कीच काहीतरी देतील : उदय सामंत यांचा विश्वास

सिंधुदुर्ग : राज्यातील राजकीय सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. अंगणेवाडीत श्री. देवी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मर्यादित दौरा असला तरी नक्कीच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग विमानतळावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आई भराडी देवीच्या यात्रेला एक पारंपारिक स्वरूप आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणेवाडी, कुणकेश्वर परिसराचा विकास, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेच्या मनातील काम करत आहे. दोघेही मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काहीतरी भरीव तरतूद करतील याची मला त्यांचा एक सहकारी म्हणून खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.