खानोलकरांचे कार्य हे पिढी घडवणारे -प्राचार्य अनिल सामंत यांचे प्रतिपादन

165

खानोलकरांचे कार्य हे पिढी घडवणारे -प्राचार्य अनिल सामंत यांचे प्रतिपादन

बांदा जनसेवा निधी पुरस्कारांचे वितरण

बांदा (मंगल कामत)

जी माणसे ज्योतीसारखी जीवनभर जळत असतात तीच माणसे पुढील जीवनात फुलत असतात. ज्यांना फुलायचे असते त्यांनी जळले पाहिजे. हे त्यांचे जळणे स्वतः व इतरांनाही प्रकाशित करते. अशा प्रकारचे जळण्याचे काम डॉ. द. भी.खानोलकर यांनी आपल्या जीवनात केले, असे प्रतिपादन जनसेवा ट्रस्ट च्या वतीने दिल्या जाणार्‍या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात प्राचार्य अनिल सामंत यांनी केले.
पुढे ते म्हणाले की ही जनसेवा ट्रस्ट सर्वत्र पसरलेला अंधार दूर सारून प्रकाश दाखविणे हे काम करतेय याचा मला अभिमान आहे.
नवनिर्माण भारत निर्माण करायचा असल्यास समारंभ, भाषणे यातून होणार नसून असे इतरांसाठी कार्य करणारे लोक आहेत, त्यांच्या बरोबर काम आपल्यास केले पाहिजे, असे झाल्यास सुंदर भारत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
बांदा येथे डॉ द. भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या सन २०२३-२४ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्र शाळा बांदा नं १ येथे सभागृहात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर डॉ मिलिंद खानोलकर, पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर हरमलकर, सदाशिव सावंत, मसुरकर, प्रशांत भाट,वामन तर्फे उपस्थित होते.यावेळी डॉ खानोलकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद खानोलकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर अध्यक्ष अनिल सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले.
जनसेवा निधी बांदा तर्फे देण्यात येणारा आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार सदाशिव सावंत श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव – बेनगांव, प्राथमिक शिक्षक पुरस्कार ज्ञानेश्वर हरमलकर पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ले नंबर १, तर क्रियाशील आदर्श समाज सेवक पुरस्कार अनाम प्रेम परिवार सावंतवाडी यांना आणि आदर्श माध्यमिक मुख्याध्यापक पुरस्कार वामन रामचंद्र तर्फे, मुख्याध्यापक त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे,मालवण यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनिल सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच शालांत परीक्षेत विविध विषयांत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अध्यक्ष अनिल सामंत यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर हरमलकर, सदाशिव सावंत, प्रशांत भाट आणि वामन तर्फे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूनाथ नार्वेकर यांनी केले तर सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन मंदार कल्याणकर यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ अरविंद खानोलकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी जि.प. सदस्या श्वेता कोरगावकर, मुख्याध्यापक घावरे, दिलीप फडके, मातोंडकर , सराफदार , बालम , हेमंत खानोलकर, तुळशीदास धामापूरकर, बंड्या नार्वेकर,सुधीर शिरसाट, खानोलकर, जोशी,सनिल नाटेकर,महाबळ आदी शिक्षण प्रेमी, डॉ द.भिं.चे चाहते व जनसेवा निधीचे पुरस्कार प्राप्त शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते