- केईएम हॉस्पिटल येथे मुंबईकर व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ रोजी माजी आमदार प्रमोद जठार करणार लाक्षणिक उपोषण
कणकवली (प्रतिनिधी)
मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या मुंबई बाहेरील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी होणाऱ्या गैरसोईबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
मी माजी आमदार या नात्याने रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे वारंवार जात असतो.

यावेळी तेथे दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे माझ्या लक्षात आले . याबाबत मी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सुचना दिल्या होत्या. परंतु अदयापपर्यंत या गोष्टीकडे कोणीही गांर्भियाने पाहिलेले नाही.मुंबईत केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल रूग्णांचे नातेवाईक कोकण व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातुन येत असतात. पण त्यांना राहण्याची सोय नसल्याने ते फुटपाथवर झोपतात त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. कोविड सारख्या आजारामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक वायरल इनफेक्शन होऊन आजार पसरवू शकतात. यावर आपण मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पातुन सदर हॉस्पिटलच्या आजूबाजुला रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी महानगरपालिका प्रशासना मार्फत तरतुद करावी. किंवा केईएम हॉस्पिटलच्या आवारात इमारत बांधावी व तशी तरतुद या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात करावी. या गोष्टीकडे मुंबईकरांचे व आपल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी दि. २६/०१/२०२४ रोजी आपले केईएम हॉस्पिटलच्या आवारात माझ्या कार्यकर्त्यांसोबत लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.असा इशारा माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.








