देवगडात ४ जानेवारी पासून ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला
देवगड (स्वप्नील लोके)
देवगड तालुक्याचे सुपुत्र आद्यपत्रकार ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणार्थ देवगड येथे उमाबाई बर्वे लायब्ररी, स्नेहसंवर्धक मंडळ आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे व्याख्यानमालेचे १३ वे वर्ष असून दि. ४ ५ व ६ जानेवारी २०२४ रोजी तीन दिवस ही व्याख्यानमाला रोज सायं. ६ ते ८ वा. या वेळेत बर्वे लायब्ररी शेजारील स्नेहसंवर्धक मंडळाच्या पटांगणात होणार आहे.
या व्याख्यानमालेसाठी चिपळूण येथील श्री मंदार ओक यांचे गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी ‘तत्त्वचिंतक पु. ल.’ आणि शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी ‘स्वामी विवेकानंद आणि आजचा भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. श्री ओक यांनी कथा, कविता आणि एकांकिकेचे लेखन केले आहे. तसेच ग्लोबल स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर व्याख्याने, पु. ल. देशपांडे यांच्या चरित्राचा अभ्यास व तत्त्वचिंतक पु. ल. या कार्यक्रमाची निर्मिती आणि सादरीकरण करतात. छ. शिवाजी महाराज व त्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयावर विशेष अभ्यास आहे. महानायक अमिताभ बच्चन, आर. डी. बर्मन याविषयांवर व्याख्याने देतात. तसेच चित्रपटांवर समिक्षकात्मक लेखन करतात.
शनिवार दि. ६ जानेवारी रोजी वणे येथील सौ. धनश्री लेले यांचे ‘सण आणि संस्कार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सौ. लेले या विविध आध्यात्मिक आणि साहित्यिक विषयांवर व्याख्याने देत आहेत. नेघदूत , गंगालहरी, कुमारसंभव, नीतिशतक इ. अनेक संस्कृत काव्यांचे रसग्रहणात्मक कार्यक्रम, मालिका लेखन, सूत्रधार योगेश्वर या महानाटयाचे लेखन तसेच ‘सोनचाफ्याची फुले व ‘अलगद’ ही दोन पुस्तके पुरस्कार प्राप्त आहेत. आतापर्यंत ५०विविध विषयांवर त्यांनी संहितालेखन केले आहे. गदिमा चैत्रबन राजहंस स्वा. सावरकर शब्दप्रभू पुरस्कार, सर्वोत्कृष्ट निवेदक हा अखिल भारतीय नाटय पुरस्कार इ. विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानांचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री सागर कर्णिक आणि सचिव श्री संजय धुरी यांनी केले आहे,





