वेंगुर्ले : दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेले तालुक्यातील मातोंड-पेंडूर येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक उत्सव रविवारी (ता. १७) होणार आहे. या उत्सवाला श्री देव घोडेमुखच्या ३६० चाळ्यांना कोंब्यांचा बळी दिला जातो. त्यामुळे ही जत्रा ‘कोंब्यांची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिर यानिमित्त सकाळपासून दिवसभर मंदिराच्या ठिकाणी श्री देव घोडेमुख विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे श्री घोडेमुख हे वस्तिस्थान आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती, भूत-पिशाच्च गण यांचा नायक म्हणून श्रींचा या ठिकाणी वास आहे. निसर्गरम्य परिसर व डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या मंदिराचे दर्शन दूरवरून भाविकांना होते. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ७०० ते ८०० मीटर अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे. आबालवृद्ध भाविक श्रद्धेने हा डोंगर पार करून श्री देव घोडेमुखचे दर्शन घेतात. श्री देव घोडेमुखच्या या उत्सवाला गोवा, मुंबई, कर्नाटक, कोल्हापूरसह इतर भागांतून अनेक भाविक आवर्जून उपस्थित राहून दर्शन घेतात.





