धक्कादायक – वरिष्ठाने लैंगिक शोषण केल्याचा महिला न्यायाधीशांचा आरोप.! ; न्या. चंद्रचूड यांना पत्र, इच्छामरणाची मागणी.

46

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या एका महिला न्यायाधीशाने थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. पीडित महिला जज यांनी वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हे पत्र गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे.

‘लाईव्ह हिंदुस्थान’ने इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, पीडित महिला न्यायाधीशाने अत्यंत निराशेच्या गर्तेत जात हे पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्या म्हणतात, माझा लैंगिक छळ केला गेला आहे. मला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देण्यात आली. त्यामुळे मी स्वतःला सावरु शकत नाहीये. मला आणि माझ्यासोबत त्रास झालेल्या इतरांना न्याय मिळेल, अशी आशा आहे.

पीडित न्यायाधीश पत्रामध्ये पुढे म्हणतात, मी हे पत्र अत्यंत खेदाने आणि नैराश्येत लिहित आहे. या पत्रातून मला केवळ माझ्या वेदना आणि माझ्या मागण्या मांडायच्या आहेत, त्यापलीकडे माझा काहीही उद्देश नाही. त्यामुळे सरन्यायाधीशांनी मला माझं जीवन संपवण्याची परवानगी द्यावी.

”मी मोठ्या उत्साहाने या क्षेत्रात आले होते…”

पीडित महिला न्यायाधीश पढे लिहितात, मी मोठ्या उत्साहाने आणि विश्वासाने न्यायिक सेवेत सहभागी झाले होते. सामान्यांना न्याय देता येईल, या भावना माझ्या होत्या. परंतु मला माहिती नव्हतं की, न्यायासाठी मलाच याचना कराव्या लागतील.

सहा महिन्यांपूर्वी मागच्या पोस्टिंगमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार झाले, असा आरोप महिलेने केला आहे. ”आपल्या प्रकरणात निष्पक्ष तपास होईल, अशी शक्यता मला वाटत नाही. आपल्याला आपल्या वरिष्ठाने रात्री भेटावयास बोलावले होते, त्यानंतर आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही.”

पत्रामध्ये पीडिता लिहितात, आता मला जगण्याची अजिबात इच्छा नाहीये. मागच्या दीड वर्षांमध्ये माझी अवस्था जिवंत प्रेतासारखी झालेली आहे, माझ्या आयुष्याचा आता काहीही उद्देश उरला नाही. त्यामुळे माझं आयुष्य मला सन्मानाने संपवण्याची परवागी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रामधून केली आहे.