बांदा : मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानक नजीक ढाब्यासमोर दुभाजकात सडलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. डंपरचालकाच्या निदर्शनास मृतदेह पडल्यानंतर पोलीसांना त्याबाबतची माहिती दिली. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. सदर इसम सडलेल्या स्थितीत असल्याने चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने ओळख पटलेली नाही. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बांदा पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा बस स्थानक नजीकच्या ढाब्यासमोर दुभाजकामध्ये सडलेल्या स्थितीत मृतदेह असल्याची माहिती डंपरचालकाने दिली. सदर इसमाच्या अंगावर खाकी शर्ट व राखाडी कलरची पँट होती. मृतदेह पूर्णपणे कुजून गेला होता. दुभाजकात गवत वाढल्याने तो कोणाच्याही निदर्शनास पडला नाही. बांदा पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात आणला.
बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. सदर इसम ४० ते ४५ वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. ३ ते ७ दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्हत्या. सदर इसमाचा मृ्त्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सा्गितले.
यावेळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस कर्मचारी विजय जाधव, विक्रम गवस, रसिका माळकर आदी उपस्थित होते. बांदा पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे




