बापरे..! ३ बँकांचे कर्मचारी अन् ४० मशिन्सही थकल्या.! ; धीरज साहूंच्या घरी सापडलेल्या नोटा मोजता मोजता आयकर विभागाच्या नाकी नऊ.

317

रांची : ६ डिसेंबर रोजी धीरज साहू यांच्या घरावर छापा टाकल्यापासूनच रोख रक्कम जप्त करण्याचं सत्र सुरू झालं. त्यानंतर जप्त करण्यात आलेली रक्कम मोजण्यात कर्मचारी आणि मशीन दोघांचीही कसोटी लागली. खासदार धीरज प्रसाद साहू आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापे टाकून कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, रोख मोजणीसाठी आणखी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

तब्बल तीन बँकांचे कर्मचारी आयकर विभागाच्या छापेमारीत जप्त करण्यात आलेली रक्कम मोजण्यासाठी जुंपले आहेत. आयकर विभागानं झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर छापा टाकून आतापर्यंत 353 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी आयकर विभागानं आणखी 40 नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत. तसेच, 3 बँकांच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

अनेक नोटा मोजण्याच्या मशीन तर थेट बंद पडल्या पण रोकड काही संपली नाही. अजुनही छापेमारीत जप्त करण्यात आलेली रक्कम मोजण्याचं काम सुरूच आहे.