भावी सैनिकी अधिकाऱ्यांचे ‘ते’ फोटोसेशन ठरले अखेरचे…!

971

प्रा. रूपेश पाटील.

देवगड : मोठ्या हौसेने आई आणि वडील आपल्या मुलांना विविध शैक्षणिक संस्थेत दाखल करतात. मुलांचं आयुष्य उज्वल व्हावं यासाठी ते अविरत झटत असतात मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आई आणि बाबा दोघीही अपार कष्ट घेतात. मात्र मुलांची सगळी हौस-मौज पूर्ण करतात. याचे भान मात्र युवा जोश असलेल्या आजकालच्या मुलांना राहत नसल्याचे वारंवार दिसून येते. अशीच दुर्दैवी घटना आज देवगडात निदर्शनास आली.

पुणे येथून जवळच असलेल्या पिंपरी चिंचवड येथील संकल्प सैनिक अकॅडेमीची सहल देवगड येथे आली होती. या सहलीत एकूण 35 विद्यार्थी होते. यातील काही विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात गेले. यावेळी आपल्या युवा जोशात  समुद्रात खोलवर जाऊन त्यांनी पोहोण्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र हा आनंद त्यांचा जीवघेणा ठरला. या घटनेत चार मुलींचा दुर्दैवी मृत्यू तर झालाच तर एक मुलगा बेपत्ता असून एकाला वाचवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.  या सहलीतील मृत्यू झालेल्या प्रेरणा डोंगरे, अंकिता गारले, अनिशा सकपाळ, पायल बनसोडे या चौघींसाठी कोकणची ही सहल अखेरचीच सहल ठरली.  तर आकाश तुपे याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले असून राम डिचोलकर मात्र बेपत्ता आहे.

या एकूण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकण प्रांत हादरला आहे. पोहण्यापूर्वी सर्वांनी एकत्र येऊन एक फोटो काढला आणि हाच फोटो त्या चौघींसाठी अखेरचे फोटोसेशन ठरले. या घटनेने त्यांच्या पालकांवर व मित्र परिवारावर काय बेतली असेल याची कल्पनाही करवत नाही. मात्र “कोण दिवस येईल कैसा.?, नाही देहाचा भरवसा..!” म्हणतात तेच खरे..!