महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम…!

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी केले अभिनंदन…

मुंबई : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’ चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी संचालनालयाचे अभिनंदन केले. याबद्दल आज राज्य शासनाच्यावतीने सेवा सदन या शासकीय निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थीचा सन्मान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 मधील विविध स्तरांवरील मूल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताकदिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला.

यावेळी RDC कन्टीजंट आधिकारी म्हणुन फर्ग्युसन महाविद्यालयातील NCC आधिकारी लेफ्टनंट डाॅ नंदकुमार बोराडे तसेच RDC कन्टीजंट कमांडर कर्नल निलेश पाथरकर यांचा सत्कार मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, जामनेर नगराध्यक्ष सौ. साधना महाजन यांचं बरोबर, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी हे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. एनसीसी च्या मध्यामातुन विद्यार्थी दशेत एकता, शिस्त, तसेच राष्ट्रभक्ती,दृढ होण्यास मदत होते. मी सुद्धा एनसीसी च्या माध्यमांतून विद्यार्थी दशेत सहभागी होत असे अंशी आठवण ही या निमित्ताने विद्यार्थ्यांना सांगीतली. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगीरी अतिशय दिमाखदार आहे. भविष्यात ही अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन ही यावेळी उपस्थितांना त्यांनी दिले.

महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 18 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याने सात वर्षांनी सलग दोन वर्ष ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.