अर्थसंकल्प 2023 विशेष 2 | पुढील वर्षभर गरिबांना महिन्याला मोफत अन्नधान्य

अर्थसंकल्प 2023 विशेष 2 : करोना संक्रमण काळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली होती. त्यामुळे गरिबांना महिन्याला मोफत अन्नधान्य मिळाले. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही सरकारने ही योजना सुरूच ठेवली. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करत ही खाद्यान्न योजना पुढील वर्षभर सुरू ठेवण्यात येईल, असं घोषित केल आहे. 28 महिने 80 कोटी लोकांना मोफत धान्य या अंतर्गत दिले गेले. आता पुढील वर्षभरही आम्ही गरजू कुटुबांना मोफत धान्य मिळणार आहे.

त्यासाठी सरकार 2.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेनं वाटचाल करत असून भारताचा विकास दर ७ टक्के असल्याचं त्यांनी अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करताना हा अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प असल्याचं म्हणत अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात केली. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्ग, महिलांसह समाजातील प्रत्येक वर्गांच्या विकासाची रुपरेखा असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.

2014 पासून केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावला आहे. त्यांना सन्मान मिळाला असल्याचे सीतारामन म्हणाल्या. देशाच्या दरडोई उत्पन्नात दुपटीपेक्षा अधिक वाढ होऊन ते 1.97 लाख रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या 9 वर्षांत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाल्याचे गौरवउद्गार त्यांनी यावेळी काढले .