बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन फोटो शेअर करत पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली. या अनुभवामुळे आपला देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याची पाहणी केली. सोबतच त्यांनी तेजस विमानामध्ये भरारी देखील घेतली.
तेजस हे सिंगल सीटर जेट विमान आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विन-सीटर तेजस विमानाची सफर केली. यामध्ये पंतप्रधान मोदी मागे बसले होते. या ट्विन सीटर व्हेरियंटचा उपयोग ट्रेनिंगसाठी केला जातो.





