कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील पर्यावरण विभागातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी अभियान या उपक्रमाद्वारे विद्यार्थी व शिक्षक यांनी वृद्धाश्रमाला भेट देवून दिवीजा आश्रमातील कुटुंबापासून दूर असलेल्या आजी – आजोबा यांना मायेचा पाझर फोडणारे प्रेम विद्यार्थिनी वाटले .
विद्यामंदिर प्रशालेत मूल्य संस्कारांचे शिक्षण दिले जाते . विद्यार्थ्यांना कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करण्यासाठी आणि कुटुंबातील नात्यांचे ऋणानुबंध अबाधित राहाण्यासाठी शाळेतच नात्यांचे रेशिम बंध बांधण्याचे संस्कार नेमही शिकविले जातात . त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिवीजा आश्रमातील वृद्धाश्रमात जावून दाखविण्यात आले. कारण आज आधुनिक काळाचा विचार केला तर कौटुंबिक नात्यांच्यात दुरावा निर्माण झालेला दिसतो . आई – वडील वृद्ध झाले की कुटुंबात त्यांचे पालन पोषण करणे कठिण झाले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात माणूस आत्ममग्न झालेला आहे . कुटुंबातील संवाद हरवले आहेत. माया ‘प्रेम ‘ आपुलकी दुरावली आहे . वृद्धांना मायेचा ओलावा मिळावा या उद्देशाने नव्या पिढीला नात्यांचा ओलावा निर्माण होण्यासाठी प्रशालेतील अध्यापकांनी एक दिवसाची दिवीजा आश्रमाला भेट देण्याचे नियोजन करून विद्यार्थी पालक यांना आवाहन करून वृद्धाश्रमाला भेट देण्याचा उद्देश निश्चित केला . या उद्देशांचे नेटके नियोजन शिक्षक प्रसाद राणे, सौ.केळुसकर मॅडम, सौ. हरमलकर मॅडम यांनी केले . विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिवीजा आश्रमाला सढळ हातांनी मदत केली. कोणी पैसे दिले, कोणी धान्य रुपात मदत केली तर कोणी वस्तू रूपात मदत केली. मदतीचा ओघ मोठ्याप्रमात निर्माण झाला. विद्यार्थ्यांना दिवीजा आश्रमापर्यंत जाण्यासाठी सौ. हरमलकर मॅडम यांनी स्वतःची गाडी दिली तसेच प्रसाद राणे, सौ . केळुसकर मॅडम यांनीही स्वतःची गाडी विद्यार्थ्यांच्या वाहातुकीसाठी दिल्या.
सुंदर नियोजन करून साठ विद्यार्थी, पालक व प्रशालेतील शिक्षक मिळून भरगच्च सहल वृद्धाश्रमाच्या भेटीला निघाली .
दिवीजा आश्रमात गेल्या नंतर विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थी आश्रमातील आजी आजोबा यांच्यात एकरूप झाली . विविध उपक्रम तिथे प्रात्यक्षिकासह विद्यार्थांनी साकार केले . आजी आजोबांचे पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांची मुलाखत घेऊन सुख दुःखात एकरूप झाले. दोन ते तीन तास प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी तेथील आजी – आजोबात दिवाळीचा आनंद लुटून सुखद क्षण घालविले.

जीवनातील नाती किती घट्ट असतात, यांचे वास्तव अनुभवले. विद्या मंदिर प्रशालेतील हे मायेचे संस्कार प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रसाद राणे, सौ. शर्मिला केळुसकर, सौ. हरमलकर, सौ. शिरसाट, श्रीम. आर. आर, कदम, सौ लिमये . श्री. अरुण इंगळे आणि पालक उपस्थित होते .
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी. जे. कांबळे सर यांनी जुनीपिढी व नवी पिढी यांचे ऋ्णानुबंध किती महत्वाचे असतात या संबंधी मार्गदर्शन करून शुभ आशीर्वाद दिले पर्यवेक्षिका सौ. जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या संस्कारक्षम उपक्रमांचे कौतुक केले .





