देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील सुनील जगन्नाथ जाधव वय 55 यांनी गळफास लावून आत्महत्या केली.पडवणे धारेचे काटे येथील मांगराच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडाला भेटायला लावलेले स्थितीत शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या मृतदेह आढळला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील जगन्नाथ जाधव हे अविवाहित असून ते कायम मुंबईला राहत होते. दोन दिवसापूर्वीच मुंबई येथून गावी पडवणे येथे ते गावी आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते. गावी आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी जाण्यास निघाले त्यावेळी त्यांनी त्यांच्या वहिनीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. शुक्रवारी सकाळी 9:30 च्या सुमारास दूध विक्री करण्यास जाणाऱ्या महिलेला धारेचे काटे येथील मांगराला जवळ असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत ते दिसले. त्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या भावाला दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांना कल्पना दिल्यावर त्यांनी भाऊ व इतर ग्रामस्थ यांच्यासमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी केली व देवगड पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर देवगड पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार बिर्जे, पोलीस कॉन्स्टेबल आचरेकर आदींनी घटनास्थळी जाऊन गळफास लावलेल्या स्थितीत असलेल्या मृतदेह काढून पंचनामा केला. या घटनेची खबर मयताचे पुतणे दीपक गुरुनाथ जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहे.





