कणकवली : स्वर्गीय आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे प्रयोगशील आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व होते. आपल्या जीवन जगण्यातून त्यांनी अनेक आदर्श समाजात घालून दिले आहेत. गोपुरी आश्रम हे प्रयोगाचे केंद्र व्हावे, ही त्यांची महान अपेक्षा होती, मात्र अलीकडच्या काळात आपण भौतिक लालसेपोटी आणि स्वार्थापोटी समाजाभिमुख विधायक कार्यापासून दूर जात आहोत, हे योग्य नाही. अप्पासाहेबांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी गोपुरी आश्रमात महात्मा गांधीजींनी सांगितलेले आणि आप्पासाहेबांनी साकारलेले प्रयोग पुनश्च निर्माण व्हावेत, असा आशावाद ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक काका करंबळेकर यांनी गोपुरी आश्रम, वागदे येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर होते.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम वागदे, ता. कणकवली आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आयोजित कोकण गांधी पूज्यनीय अप्पासाहेब पटवर्धन यांचा १२९ वा जयंती उत्सव गोपुरी आश्रम येथे संपन्न झाला. यावेळी काका करंबळेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कणकवली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रोटरी क्लबचे सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. संजीव लिंगवत (वेंगुर्ला), विजय कालिदास सावंत (उपाध्यक्ष गोपुरी), ईर्शाद शेख (वेंगुर्ला), पत्रकार महेश सरनाईक, अर्पिता मुंबरकर, ॲड. मनीषा पाटील (संचालक – गोपुरी), अमोल भोगले (खजिनदार – गोपुरी आश्रम) मंगेश नेवगे (सचिव – गोपुरी), विजय चौकेकर (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती), स्मिता नलावडे, माया रहाटे (सावंतवाडी), शितल मांजरेकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री (संचालक – गोपुरी) आदि उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर होते. म्हणाले, स्वर्गीय अप्पासाहेबांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी गोपुरी आश्रमात विविध प्रयोग सातत्याने आम्ही करीत आहोत, आगामी काळातही अशाच विविध प्रयोगांची आखणी केलेली आहे. त्यासाठी समाजाचा सहभाग मिळणे आवश्यक आहे. अनेक लोकांचे सहकार्य मिळत आहे, यापुढेही अनेकांच्या सहकार्याने गोपुरी आश्रमाला पूर्वस्थितीत आणण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. समाजातील संवेदनशील आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांनी गोपुरी आश्रमासाठी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. मुंबरकर यांनी व्यक्त केली. नशाबंदी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष अर्पिता मुंबईकर यांनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्गचे आजपर्यंतचे झालेले कार्य आणि गोपुरी आश्रम यात चाललेले विविध प्रयोग याबद्दल आढावा सादर केला.
दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेले डॉ. संजीव लिंगवत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा ही महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला लाभलेली एक देणगी आहे. सिंधुदुर्गात तब्बल 44 किल्ले असून अनेकांना ही महत्त्वाची गोष्ट माहित नाही. युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासासाठी गोपुरी आश्रम येथे विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे, असे सांगत त्यांनी आपण केलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. पत्रकार महेश सरनाईक यांनी आपल्या मनोगतातून पुढील काळात गोपुरी आश्रमात समाजाच्या विविध घटकांचा सहभाग घेऊन अनेक प्रयोग राबविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आपण देखील गोपुरी आश्रमाला हवे ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सामाजिक कार्यकर्ते इर्शाद शेख, सिताराम कुडतरकर यांनी देखील आपल्या मनोगत आतून आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याचा आढावा घेत समाजातील विविध स्तराचा विकास कसा केला जाईल, हे स्पष्ट केले. ॲड. मनीषा पाटील यांनी गोपुरी आश्रम हे माणूस तयार करण्याचे केंद्र आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक उपक्रम राबविले गेले. त्यातून सक्षम अशी युवा पिढी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयोग राबविणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन गोपुरी आश्रमाला संस्काराचे महान केंद्र बनविण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोगले यांनी तर आभार प्रदर्शन बाळू मेस्त्री यांनी केले.
यावेळी व्यसनमुक्ती ब्रँड अँबेसिडर सदाशिव उर्फ बाबू राणे (सातरल- कणकवली), ॲड. प्राजक्ता शिंदे (महिला ब्रॅंड ॲंबॅसिडर) यांची नियुक्ती करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या गुणवंतांचा झाला सन्मान –
कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने विधायक कार्य करणार्या गुणवंतांचा प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात कामिनी किशोर नाईक (साळशी), रंजना रामचंद्र कदम (ईळये – देवगड), प्रा.रुपेश युवराज पाटील (आजगाव-सावंतवाडी), सुनील सखाराम कांबळे (वेंसर), राजेंद्र सखाराम कदम (गडमट), श्रद्धा सूर्यकांत कदम (कलमठ), मुराद अली शेख (ओसरगाव), पुजा दळवी (कणकवली), रीमा राजन भोसले (कणकवली), सामिया चौगुले (देवगड), रिया सूर्यकांत गावडे (कणकवली), शितल रामदास मांजरेकर, गीतांजली लक्ष्मण नाईक (कणकवली), संग्राम सतीश कासले, माया जगन्नाथ रहाटे(सावंतवाडी), रंजना सचिन अडुळकर(कणकवली), डॉ. संजीव लक्ष्मण लिंगवत (वेंगुर्ला), महादेव अण्णाप्पा सातपुते (कुडाळ), विशाल वैशाली आनंद, गुरुप्रसाद तेंडुलकर(कणकवली), अनिल चव्हाण(घोणसरी), रूपाली पाटील (वेंगुर्ला), मकरंद वायकर, विष्णू रामागडे (कणकवली) यांना व्यसनमुक्ती प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.





