मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकीय कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. अजित पवार काल बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहिले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतल्याने अजित पवारांनी हा दौरा स्थगित केल्याचे बोलले जात होते. यादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, असे ट्विट राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्यावरून प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या दिल्या जात आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मदत आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, अशी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर केली आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची कोंडी झाली आहे. बारामती तालुक्यात देखील अनेक गावांनी अशीच भूमिका घेतली.यामुळे अजित पवारांना बारामतीतील नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे टाळल्याची चर्चा होती. यादरम्यान आता त्यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे.





