तीन तरुणांनी मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन.! ; आत्महत्यांनी मराठवाडा हादरला.

50

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी तरुण मंडळी आता टोकाची पावलं उचलायला लागली आहे. आज मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये तिशीतल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्यानं मराठवाडा हादरला आहे. या तिघांनीही सुसाईड नोट लिहून आपलं जीवन संपवलं आहे.

संभाजीनगरमध्ये २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या –

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका, असा मजकूर पाटीवर लिहून मराठा आरक्षणासाठी आपतगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) इथं एका मराठा तरुणानं गुरुवारी (ता. २६) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.  गणेश काकासाहेब कुबेर (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (चार व सहा) आई वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांना दोन एकर शेती असून या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते. गुरुवारी दुपारी सुमारे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घरी ते एकटेच असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

डिप्रेशनमध्ये उचललं पाऊल –

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मागील आठ पंधरा दिवसापासून ते डिप्रेशन मध्ये आले होते, अशी माहिती त्यांचा मित्र अभिषेक भोसले यांनी दिली. या घटनेमुळे परिसरातील विविध गावातील नागरीकांनी आपतगाव येथे धाव घेतली. तब्बल एक ते दोन हजारांचा जमाव घटनास्थळी ठिय्या देवून होता.

हिंगोलीत २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या – 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील बाळापूरपासून जवळ असलेल्या देवजना इथं एका तरुणानं गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय २५) हा युवक शेतमजुरीचे काम करून ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता.

शेतात चिठ्ठी लिहून आत्महत्या –

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ट्रॅक्टरवर जाऊन तो हरभरा पेरण्यासाठी देवजना शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गेला होता. सोबत असणारे एका व्यक्तीला आता बाहेरुन जाऊन येतो असे म्हणून गेला. बराच वेळ झाला तरी तो न आल्याने आजूबाजूच्या लोकांनी परिसरात त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.

तर बाजूला असलेल्या शेतात त्याने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिथंच एका चिठीमध्ये “मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे” असं लिहून त्यानं आपलं जीवन संपवलं. मृत कृष्णा कल्याणकर यांच्या पश्चात आई-वडील एक मोठा भाऊ एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

जालन्यात ४२ वर्षीय तरुणानं संपवलं जीवन –

अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) येथील एका मराठा बांधवानं गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी अण्णासाहेब माने (वय ४२) असं त्यांचं नाव आहे. दोन एकर जमिनीवर शेती करून ते कुटुंबाची उपजीविका भागवत होते.

घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं दोन्ही मुलांना शिक्षण देताना अडचणी येत होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत त्यांनी गुरुवारी घरी गळफास घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी काहींना सांगितले होते