देवगड येथील बर्वे ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन.!

71

देवगड : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाने खरेदी केलेल्या आणि देणगीस्वरूपात प्राप्त झालेल्या ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन श्री स. ह. केळकर महाविद्यालयाच्या वरीष्ठ कला शाखेच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. मयुरी तेली यांनी दीपप्रज्वलनाने केले. प्रा. तेली यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर भाष्य करताना डॉ. अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक आणि भारताला उज्ज्वल स्वप्न दाखवणारे द्रष्टे लोक शिक्षक म्हणून ते आदरणीय होते. रामेश्वरम् खेडयातील एका गरीब नावाडयाचा मुलगा ते मिसाईल मॅन व पुढे राष्ट्रपती हा त्यांचा जीवनाचा प्रवास आजच्या पिढीसमोर एक आदर्श आहे. त्यांचे विज्ञान व साहित्य क्षेत्रात भरीव योगदान असल्याचे सांगून त्यांच्या पुस्तकांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच समाज वाचनाभिमूख करण्यासाठी ग्रंथालयाचे योगदान मोठे आहे, असे सांगून वाचन संस्कृती कशी वृद्धिंगत करावी, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेठ म. ग. हायस्कूलची विद्यार्थीनी कु. अंजली कावले हिने वाचनाचे महत्त्व आणि का वाचावे याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. मयुरी तेली यांनी सरस्वतीच्या मूर्तीला आणि डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री सागर कर्णिक यांनी प्रा. मयुरी तेली व कु. अंजली कावले यांचे स्वागत केले. तसेच कु नूपूर लळीत हिने विद्यापीठ स्तरावर कथाकथन स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. सदर ग्रंथप्रदर्शन शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर पर्यंत सर्वांसाठी खुले राहिल. सर्व वाचन प्रेमीनी याचा लाभ घ्यावा, असे श्री कर्णिक यांनी सांगितले आणि मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रंथालयाचे संचालक सदस्य श्री दत्तात्रय जोशी, डॉ. स्वाती कर्णिक श्री. प्रकाश पंडित, श्री. विरेंद्र मोंडकर, सौ. प्रेरणा कावले, श्री कोयंडे आणि वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.