सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेली सैनिकी परंपरा आदर्शपणे जपण्याचं महान कार्य दिवंगत पी. एफ. डॉन्टस यांनी केलं आहे. त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात योगदान चिरंतन राहील. देशाच्या अशा आदरणीय आणि वंदनीय सैनिकाला सॅल्यूट करणे माझं कर्तव्य मानतो अशा भावपुर्ण शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली.
सावंतवाडी येथील नवसरणी सभागृहात स्व. पी. एफ. डॉन्टस यांच्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत, फादर मिलेट डिसूझा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे -परब, एम. डी. देसाई, बाबुराव कविटकर, रुजॉय रोड्रिक्स,राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, माजी उप नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, मायकल डिसोजा, राजू मसुरकर,रविद्र मडगावर आदी उपस्थित होते.
शोक सभेची सुरुवात स्वर्गीय पी.एफ. डान्टस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
ब्रिगेडियर श्री सावंत म्हणाले, माझे मित्र सहकारी पी एफ डॉन्टस यांचे निधन आजही मनाला न पचणारे आहे. सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सहकार राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम करून माणसं घडवण्याचं काम केलं. समाजासाठी समाजातील घटकांसाठी काम करत असताना कधीही स्वतःला डाग लागू नये याची काळजी त्यांनी घेतली. एकत्र काम करत असताना भविष्यात मोठा रोजगार देणारा उद्योग आणण्याचा आमचा उद्देश होता मात्र हे काम अपुरे राहीले. त्यांनी सहकार क्षेत्रात उभ्या केलेल्या संस्था आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले काम त्यांचे चिरंजीव जॉय डाॅन्टस त्यांचे शिष्य यांनी एकत्र येऊन पुढे नेऊया.
माजी राज्यमंत्री भोसले म्हणाले, कॅथोलिक समाजासोबतच अन्य समाजातील लोकांना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती पी एफ डाॅन्टस यांच्यामध्ये होती. त्यांचे कार्य सार्वभौमत्व होते राजकीय क्षेत्रात सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. सतत जागृत राहणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. माझ्या जीवनात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे स्थान खूप महत्त्वाचे होते.
ॲड. नार्वेकर म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करणं साधं सोपं नाही या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला प्रचंड बुद्धीची गरज असते पी.एफ डाॅन्टस यांच्याकडे ही बुद्धी होती. एक प्रकारे हे व्यक्तिमत्व म्हणजे जगाचा प्रकाश होता त्यांच्या मागे गेलेल्या सर्वांचे जीवन प्रकाश माहीत झाले.
अर्चना घारे म्हणाल्या, डाॅन्टस यांनी केलेली देशसेवा सहकार क्षेत्रात उभारलेले जाळे हे त्यांचे कार्य पाहता आजच्या तरुणांना प्रेरणा देणार आहे सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या नेतृत्व आज आपल्यात नाही हे कधीही न भरून येणारी हानी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राऊळ यांनी केले.ते म्हणाले, पी एफ डॉन्टस हे पितृतुल्य व्यक्तिमत्व होत. नेतृत्व गुणांनी ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व आज हरपलं आहे.माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम केलं. आमच्यासाठी दीपस्तंभा प्रमाणे असणारे डॉन्टस या जगातून निघून गेले हे आजही मनाला पटत नाही.

यावेळी, बबन साळगावकर,रुजॉय रोड्रिक्स, एम.डी देसाई,अनारोजिन लोबो, मायकल डिसोजा, बाबुराव कविटकर, अशोक दळवी,साक्षी वंजारी, राजू मसुरकर, राजू तावडे, कुंदा पै, फादर मिलेट डिसूझा,अन्नपूर्णा कोरगावकर आदींनी शब्द सुमनाने श्रद्धांजली व्यक्त केली.
दरम्यान आमच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलेल्या सर्वांचे आम्ही डॉन्टस कुटुंबीय ऋणी राहो. वडील म्हणून त्यांनी केलेले विविध क्षेत्रातील कार्य जपण्याचे सदैव प्रयत्न करू या शब्दात जाॅय डाॅन्टस यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

- या शोकसभेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, एक्स सर्व्हिसेस लीगचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, दिनानाथ सावंत, माजी सैनिक तातोबा गवस, डॉ. विलास सावंत, कॅथलिक बँकेचे सीईओ जेम्स बोर्जेस, सैनिक स्कूलचे दिपक राऊळ, चंद्रशेखर जोशी, सुरेश भोगटे, फ्रान्सिस रोड्रिक्स, नीरज देसाई, कर्नल विजयकुमार सावंत, दिलीप भालेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, जिल्ह्यातील आजी – माजी सैनिक, डॉन्टस कुटुंबीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.





