रानटी डुक्करांची ‘येथे’ दहशत, उभ्या पिकांची नासाडी.! ; वनविभाग नेहमीप्रमाणे ‘ढिम्म’, नुकसान भरपाईची बळीराजा फाऊंडेशनची मागणी.

128

रोहा : शशिकांत मोरे

रोह्यात शहर, ग्रामीणात भटके कुत्रे, गुरांचा प्रचंड चक्काजाम आहे.शहरात वाढलेली डुक्करे, कुत्रे, गावांगावात वाढलेल्या कुत्र्यांची दहशत अनेकांच्या जीवावर उठत आहे. डुक्कर, कुत्र्यांच्या वाढत्या अडथळ्याने दररोज अपघात होत आहेत. डुक्करे, कुत्र्यांच्या धडक अपघातात अनेकजण जायबंद झाले. दुसरीकडे भर रस्त्यातील कुत्र्यांच्या झुंडीने आबाळवृद्ध व लहान मुलांनी अक्षरशः धसका घेतल्याचे भयान वास्तव आहे. मात्र रोहा नगरपरिषद, वरसे ग्रामपंचायत कोणीच प्रशासन डुक्कर, कुत्र्यांच्या दहशतीकडे लक्ष देत नाहीत ही ओरड असतानाच आता रानटी डुक्करांनी शहर आजुबाजुच्या गावांत चांगलाच हैदोस घातल्याचे भयाण दृश्य समोर आले आहे.
आता रानटी डुक्करांची दहशतही सामाजिक स्वास्थ बिघडविण्याला कारणीभूत ठरत आहे. वाढत्या डुक्करांच्या कळपाने उभ्या भातशेती, भाजीपाला, बागायत शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी केली. भाताची उभी पिके डुक्करांनी आडवी पाडल्याने बळीराजा अक्षरशः रडकुंडीला आला आहे. दरम्यान, रानटी डुकरांची दहशत रोखण्यासाठी वनविभागाकडे काहीच यंत्रणा नाही. त्यामुळे वनविभाग नेहमीप्रमाणे ढिम्म दिसत आहे. तळाघर, चणेरा, घोसाळे, कोलाड सर्वच भागातून डुक्करांच्या उपद्रव्याच्या तक्रारी वनविभागाकडे आल्यात, मात्र वनविभागाने अद्याप काहीच उपाययोजना केली नसल्याने बळीराजाने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.


रोहा शहरात गावठी डूकरे, कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. प्रत्येक चौक नाक्यावर कुत्र्यांची मुक्तपणे रपेड असते. कुत्र्यांची ही दहशत आतापर्यंत अनेकांच्या जीवावर उठली. कुत्र्याच्या हल्ल्यात शहरातील एका नागरिकाचा मागील महिन्यात प्राण गमावला. तरीही नगरपरिषद प्रशासनाला जाग आलेले नाही. त्यातच डुक्कर रस्त्यात आडवेतिडवे येत असल्याने अनेकजण गाडीवरून पडून जायबंदी झालेत. त्यातच रोहा, वरसे हद्दीत कुत्रे, डुक्करांच्या दहशतीत वाढ होत आहे हेही आता कमी पडल्याने रानटी डुक्करांच्या झुंडगिरीची भर पडली. घोसाळे, चणेरा दुर्गम भागासह निवी, तळाघर, लांढर गावातील शेतीची रानटी डुक्करांनी प्रचंड नासाडी केली. उभी भातशेती आडवी पाडली. भाजीपाला, बागायती झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. डुक्करांची दररोज रात्रीची झुंड नागरिकांना भयभीत करणारी झाली. निवी, लांढर रस्त्यावर याच रानटी डुक्करांनी आतापर्यंत अनेकांना पाडले. अपघातात अनेकजण जखमी झाले. उनाड गुरे, मोकाट कुत्र्यांत आता रानटी डुकरांची भर पडल्याने सामाजिक सुरक्षा अधिकच धोक्यात आले आहे. डुक्करांनी शेकडो एकर भातशेतीची नासाडी केली, याबाबत वनक्षेत्रपाल मनोज वाघमारे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, डुक्करांचा उपद्रव कमी होण्याच्या उपायांवर चर्चा झाली, मात्र डुक्करांची दहशत रोखण्यासाठी यंत्रणा वनविभागाकडे नाही, त्यामुळे रानटी डुक्करे अजून सर्वकश शेतीची किती नुकसान करतील ? हीच धास्ती बळीराजाला कायम आहे.

रानटी डुक्करांनी नुकसान केलेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केली, तसे निवेदन वनक्षेत्रपाल मनोज वाघमारे, कृषी अधिकारी महादेव करे यांना दिले जाणार आहे, अशी अधिक माहिती बळीराजा फाउंडेशनचे सचिव ॲड दीपक भगत यांनी दिली. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे रानटी डुक्करांनी नुकसान केले आहे, त्या शेतीचे फोटो, सातबारा काढून ठेवावे, असे आवाहन बळीराजा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे, तर डुक्करांनी केलेल्या भातशेती, भाजीपाला, झाडांच्या नुकसानीचे पंचनामे करुन योग्य ती भरपाई देण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सजगता दाखवावी अशी सार्वत्रिक भावना व्यक्त झाली आहे.