अहमदाबाद : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशा एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या महामहोत्सवाचा आजपासून श्रीगणेशा होत आहे. ठिकाण ऐतिहासिक आणि विशाल असे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी गतवेळचे विजेते आणि उपविजेते अनुक्रमे इंग्लंड आणि न्यूझीलंड. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आक्रमणात एकदिवसीय क्रिकेटचे नवे पर्व या १३ व्या स्पर्धेतून कसे तयार होते, यावर एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य ठरणार आहे.
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने गतवेळेस २०१९ मध्ये प्रथमच विश्वविजेतेपद मिळवले. त्यांनी केन विल्यम्सनच्या न्यूझीलंड संघाला ‘न हरवता’ (मुख्य डाव आणि सुपर ओव्हरही टाय) विजेतेपदाचा करंडक उंचावला होता. मॉर्गन निवृत्त झालाय, तर विल्यम्सन अजून पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे जॉस बटलर आणि टॉम लॅथन हे प्रतिस्पर्धी कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकतील.
इंग्लंडचा संघ गतविजेता तर आहेच, पण त्यांनी ट्वेन्टी-२० विश्वकरंडकाचेही विजेतेपद मिळवलेले आहे. त्यामुळे चार वर्षांत तिसऱ्या विश्वविजेतेपदाची मोहीम ते उद्यापासून सुरू करत आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे काहीसा तळ्यात-मळ्यात आहे, पण विश्वकरंडक स्पर्धा म्हटली की कोणत्याही संघाला धक्का देण्याचे बळ त्यांच्या संघात येते.
सराव सामन्यात पाकिस्तानने उभारलेले साडेतीनशे धावांचे आव्हान त्यांनी सहज पार करून इशारा दिला आहे. पण उद्याच्या सलामीच्या सामन्यात त्यांना विल्यम्सन आणि टीम साऊदी या अनुभवी वेगवान गोलंदाजांशिवाय खेळावे लागणार आहे.
बेन स्टोक्सवर लक्ष, पण..-
इंग्लंडच्या गतविजेतेपदामध्ये बेन स्टोक्सची फलंदाजी निर्णायक ठरली होती. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही तो खंबीरपणे उभा राहिला होता. या विश्वकरंडक स्पर्धेसाठी तो निवृत्ती मागे टाकून पुन्हा संघात आला आहे. पण उद्याच्या सामन्यात तो खेळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
इंग्लंडकडे असलेली खोलवर फलंदाजी हे त्यांचे बलस्थान आहे. स्वतः कर्णधार जॉस बटलर, बेअरस्टॉ, हॅरी ब्रुक, लिव्हिंगस्टोन, डेविड मलान एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. या सर्वांकडे आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. मोईन अली, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यंच्यावर गोलंदाजीची मदार असेल. गेल्या आयपीएलमध्ये मार्क वूडने आपल्या वेगवान माऱ्याने दहशत निर्माण केली होती. उद्या सलामीलाच तो प्रभाव पाडण्यास तयार असेल.
विल्यम्सन आणि साऊदी उद्याच्या संघात खेळत नसले तरी न्यूझीलंडचा प्रत्येक खेळाडू एकहाती सामना जिंकून देण्याच्या प्रयत्नात कमी पडणार नाही. साऊदीमुळे कदाचित नव्या चेंडूवर त्यांची ताकद कमी पडू शकेल, परंतु आयपीएलचा अनुभव असलेल्या लॉकी फर्ग्युसनला साऊदीची जागा घ्यावी लागेल. गेल्या आयपीएलमध्ये त्याने २१ विकेट मिळवल्या होत्या, त्या अनुभवाचा तो कसा फायदा घेतो हे न्यूझीलंडसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
इंग्लंड संघ ः जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स्, जॉस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक, गस ऍटकिन्सन, रीस टोपले, डेव्हिड विली
न्यूझीलंड संघ : डेव्हन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, मिचेल सँटनर, जेम्स नीशम.
ठिकाण – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वेळ – दुपारी २ पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस आणि हॉटस्टार




