सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली श्री देवी माऊली मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातील फंडपेटी फोडली असून त्यातील सुमारे पाच ते सहा हजार रोख लंपास करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अज्ञात चोरट्याने मंदिरातील किमती ऐवज लंपास केला होता. या चोरीच्या तपास कामात अद्यापही पोलिसांना यश आले नाही.
न्हावेली येथील मंदिरातील फंडपेटी चोरीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातार्डा पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. श्वानपथक पाचारण करून अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी होऊन तपास सातार्डा पोलीस हवालदार एस.एन.टाकेकर पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक, आनंद नाईक, आत्माराम नाईक, गितेश नाईक आदी दाखल झाले आहेत.





