साहित्यकृतींचे निरंतर वाचन केल्यास हिंदी राष्ट्रभाषेचा विकास.! – प्राचार्य हेमंत प्रभू यांचा विश्वास.

103

मालवण : हिंदी भाषेचा विकास आणि प्रचार होण्यासाठी दैनंदिन जीवनात या भाषेचा वापर केला पाहिजे, हिंदी बोलण्याची भिती घालवली पाहिजे, हिंदी वृत्तपत्रांच्या वाचनाबरोबर प्रसिद्ध साहित्यकृतीचे निरंतर वाचन केल्यास हिंदी, ‘राजभाषे’कडून ‘राष्ट्रभाषा’ होईल’ असा आशावाद प्राचार्य हेमंत प्रभू यांनी व्यक्त केला. येथील सुनितादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजमध्ये ‘राजभाषा हिंदी दिन’ आयोजित केला होता. त्यावेळी श्री. प्रभू बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून, तसेच थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत प्रा. नागेश कदम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. आनंदी घोगळे यांनी हिंदी भाषेचा उगम, विकास व आवश्यकता यावर विचार मांडले, तर विद्यार्थी वर्गातून वैष्णवी पाटकर, वेदिका शेटकर, कल्पना धुरी, प्रतिक्षा वाघ यांनी हिंदी भाषेतून आपले विचार व्यक्त केले.

यानिमित्त अध्यापक विद्यालयात निबंध स्पर्धा व काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंधस्पर्धामध्ये प्रथम क्रमांक – सायली उदय गोसावी, द्वितीय – वैष्णवी अनिल पाटकर तृतीय – माधवी लिलाधर तिरोडकर तसेच काव्यलेखन स्पर्धा – प्रथम – तन्वी प्रदीप गावडे, द्वितीय – चिन्मय पुंडलिक ढोक, तृतीय- वैभव रमाकांत कदम या यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ‘क्षितिज’ नावाचे हस्तलिखित तयार केले. त्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. रमेश वळवी यांनी हिंदीतून विचार व्यक्त केले. यावेळी प्रा. दत्तात्रय माळी, प्रा.  सौ. पूर्वा शिरसाट तसेच सर्व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नागेश कदम यांनी, सूत्रसंचालन माधवी तिरोडकर हिने, तर आभार प्रदर्शन चिन्मय ढोके यांनी केले.