सावंतवाडी : सध्याच्या सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. सध्या राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरस अनेकांना आपल्या विळख्यात अडकवत असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या (BJP) एक नेत्यालाही इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

भाजप खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये Influenza Virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (Lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही.”





