ओटवणेत माडावरुन पडून एकाचा दुर्दैवी मृत्यु…!

सावंतवाडी : ओटवणे देऊळवाडीत सोमवारी सकाळी माडावरुन पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. भटवाडी येथील दिनानाथ गणपत कविटकर (६३) असे मयताचे नाव आहे. नारळ काढणारे म्हणून परिचित असलेले दिनानाथ कविटकर सकाळी पावणे आठच्या सुमारास माडावर चढले. मात्र हात सुटून ते सुमारे ४० फूट जमिनीवर आदळले.

त्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने कविटकर कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांच्या आकस्मित निधनाने वृत्त समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली.

रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परीवार आहे. येथील प्रसाद कविटकर यांचे ते वडील होते तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी दादू कविटकर, तुळशीदास कविटकर, टेम्पो चालक प्रकाश कविटकर यांचे ते भाऊ होत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार मनोज राऊत, पी. जी. नाईक यांनी तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत या घटनेची माहिती घेतली.