नाशिक : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरुन त्यांचे अपहरण झाले. माहितीनुसार शनिवारी रात्री ही घटना घडली. चारचाकी आणि दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. अपहरण झाल्याचे कळताच रहिवाशांनी पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत हेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहेत. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
एका प्रसिद्ध व्यायसायिकाला त्याच्या घरासमोरुन उचलण्यात आल्याने इंदिरानगरसह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. हेमंत पारख यांचे नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले, तसेच कोणी अपहरण केले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस याप्रकरणात तपास करत आहेत. अपहरणकर्त्यांना लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.





