सावंतवाडी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेमळे शिक्षण संस्थेतर्फे जिल्ह्यातील शिक्षकांना देण्यात येणारे पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी जाहीर केले. नेमळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि दाते कै. श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘समाज कार्यकर्ता पुरस्कार’ कुडाळ येथील ॲड. संदेश कृष्णा तायशेटे यांना जाहीर झाला आहे. जिल्हा सरकारी वकील तथा जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून बालकल्याण समिती सिंधुदुर्गकरिता अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात.

नेमळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कै. ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ नलिनी पेंढारकर यांनी पुरस्कृत केलेला उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा ता. मालवण येथील कला शिक्षक समीर अशोक चांदरकर यांना जाहीर झाला आहे. त्यांनी फेस पेंटींग, पॉट पेंटिंग, प्लेट पेंटींग, पर्यावरण पूरक गणेशमूर्ती, वाळू शिल्प, रांगोळी, चित्रकला प्रदर्शन, गायन, वादन अशा विविध कलांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच चित्ताकर्षक उपक्रम, रंगरेषांनी शाळेच्या भिंती बोलक्या केल्या, शासकीय रेखाकला परीक्षेत राज्य गुणवता यादीत क्रमांक प्राप्त विदयार्थ्यांनी केलेला आहे. त्यांचे सदर कार्य पाहून त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहकार महर्षी कै. शिवरामभाऊ जाधव यांच्या पत्नी कै. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेला ‘महिला उपक्रमशील पुरस्कार’ जि. प. पू. प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं.१, ता. वैभववाडी येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. स्नेहलता जगदीश राणे यांना जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा, स्काऊट गाईड, विज्ञान प्रदर्शन, शै.उठाव, डिजिटल शाळा, प्रयोगशाळा, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी जादा मार्गदर्शन, नवोपक्रम, विविध वृत्तपत्रांतून लेखन, एसटीएस, बाल कला-क्रीडा स्पर्धा, विज्ञानप्रदर्शन, राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश या सर्व उपक्रमांचा विचार करून त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. परीक्षण प्राचार्या कल्पना बोवलेकर, माजी शिक्षक वि. ल. गोवेकर व अनिल कांबळे यांनी केले.





