इंडिया आघाडीत मिठाचा खडा?; आपकडून बिहारमध्ये विधानसभा लढण्याची घोषणा.

40

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी आपापली तयारी करत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी एकवटलेल्या इंडिया आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील २६ पक्ष एक असल्याचा आव आणत असले तरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची स्थिती आहे. आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत कितपद ऐकी राहील हा प्रश्न आहे.

आम आदमी पक्षाने शनिवारी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा केली. बिहारमध्ये २०२५ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपचे प्रमुख सचिव संदीप पाठक यांनी बिहारमधील नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीवेळी, संदीप पाठक यांनी बिहारमध्ये ‘आप’ला मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी आपचे बिहारमधील प्रमुख अजिश यादव हेही उपस्थित होते.

बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले आहे. बिहारमध्ये आम्ही विधानसभा लढणार आहोत. पण, निवडणुका लढण्याआधी संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असं पाठक म्हणाले. गुजरातमध्ये लढल्याप्रमाणे बिहारमध्येही पूर्ण शक्तीने आम्ही निवडणूक लढवू. त्याआधी पक्ष स्थानिक निवडणुका लढवेल, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपची प्रतिक्रिया

आपच्या घोषणेनंतर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सयद शहनवाझ हुसैन यांनी प्रतिक्रिया दिली.आपला ज्यांनी बिहारमध्ये बोलावलं आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय अडचणीचा आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. सर्व जागा भाजप जिंकेल. ते लोकसभा निवडणुकाही लढू शकतात. आम्हाला काही अडचण नाही. आपला ज्यांनी बोलावलं त्यानाच यामुळे अडचण होईल, असं ते म्हणाले.