बांदा : आडाळी येथील एमआयडीसीत उद्योगधंदे आणा आणि ही उद्योगनगरी तात्काळ विकसीत करा, आम्हाला न्याय द्या, परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार द्या, असे आवाहन करीत आडाळी तसेच दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आज शासनाच्या विरोधात आडाळी ते बांदा असा लाँग मार्च काढला. या मोर्चाला सर्वपक्षीयांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तर लोकांच्या मागणीनुसार आता आडाळीत उद्योगधंदे आले पाहिजेत. त्यासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक धोरण घेतले पाहिजे, असे आवाहन सर्वपक्षीयांकडून करण्यात आले. यावेळी तब्बल ८ किलोमिटर काढण्यात आलेल्या लॉन्ग मोर्चाला गावातील ग्रामस्थ सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सदर मागणीसाठीचा बहुचर्चित भव्य ‘लॉन्ग मार्च’चा सामरोप बांदा सर्कल येथे झाला. युवक, महिलांसह अबालवृद्धांनी तब्बल ८ किमी पायी चालत रोजगाराच्या हक्कासाठी एक धक्का देत शासनाला जाग आणली.आडाळीत उद्योजक येत आहेत. पण, शासन त्यांना भूखंड देत नाही. रोजगाराच्या मुद्यावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी उद्योग आणत नाहीत. रोजगारासाठी गोवा गाठा नाहीतर मुंबई, कधी थांबणार हा जीवघेणा प्रवास ? असा जाब लॉग मार्चच्या माध्यमातून शासन व लोकप्रतिनिधींना हजारोच्या संख्येने जमलेल्या दोडामार्ग वासियांनी केला.

आडाळी MIDC सुरू करा, रोजगार आमच्या हक्काचा, आम्ही तो मिळविणारच, नको घोषणा, नको बैठका उद्योग सुरू करा, हाच आमचा हेका ? अशी जोरदार घोषणाबाजी करत आडाळी औद्योगिक क्षेत्र त्वरित कार्यान्वित करा या मागणीसाठीचा बहुचर्चित भव्य ‘लॉन्ग मार्च’ प्रस्तावित आढळी एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावरून बांदा सर्कल पर्यंत करण्यात आला. तब्बल ८ किमी पायी प्रवास करत ग्रामस्थांच्यावतीन तीव्र भावना मांडल्या. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येने यात सहभागी झाला होता. तर महिलांचाही लक्षणीय सहभाग असल्याने या लॉंग मार्चला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. आडाळी एमआयडीसी लोकाधिकार, कृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या लॉंग मार्चला रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, भाजपचे एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, दीपक केसरकर यांचे समर्थक, शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, गोपाळ गवस, माजी सभापती प्रमोद कामत, संतोष नानचे, रवींद्र मडगावकर, सुधीर दळवी, महेश धुरी, सुधीर आडीवरेकर, चंद्रशेखर देसाई, बंटी पुरोहित, आनंद नेवगी यांसह सत्ताधारी- विरोधी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.





