महिला अत्याचारासंदर्भात राजस्थान सरकारचं मोठं पाऊल ; मुख्यमंत्री गेहलोत यांची ‘ही’ घोषणा.

101

जयपूर : महिला अत्याचारासंदर्भात राजस्थान सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. त्यानुसार अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या आणि दोषींना एका मोठ्या गोष्टीला मुकावं लागणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याची घोषणा केली आहे. गेहलोत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारनं एक निर्णय घेतला आहे की अल्पवयीन मुली आणि महिलांशी छेडछाड, अत्याचाराचा प्रयत्न करणारे तसेच त्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या आरोपींना आणि दोषींना सरकारी नोकरीपासून प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्यासाठी गुन्हेगारांप्रमाणं महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पुरुषांचं पोलीस ठाण्यांमध्ये रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.

तसेच राज्य सरकार आणि पोलिसांद्वारे देण्यात येणाऱ्या चरित्र प्रमाणपत्रांवरही याची नोंद करण्यात येणार आहे. अशा समाजविघातक तत्वांचा सामाजिक बहिष्कार करणं गरजेचं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महिला अत्याचारांसंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात राजस्थानातील जोधपूरमध्ये एका १७ वर्षीय दलित मुलीवर तीन जणांकडून सामुहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी तिच्या प्रियकराला मारहाण करत मुलीवर आळीपाळीनं अत्याचार केला होता. पण पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली होती. आरोपी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असल्याचं समोर आलं होतं. मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनानंतर राजस्थानातील या घटनेवरुनही सरकारला टार्गेट करण्यात आलं होतं.