नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत एक मोठी अपडट समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत.
विधीमंडळातील सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई पुन्हा वेग येणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची म्हणणं मांडण्याची मुदत संपणार आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना २ आठवड्यांची मुदत दिली होती. याप्रकरणी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी यापूर्वीच लेखी उत्तर सादर केलं आहे.
विशेष म्हणजे शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचं लेखी उत्तर प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः ही सुनावणी घेणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांपासूनच या सुनावणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.





