CRIME – पाडलोसमध्ये बंगला फोडून १ लाख १० हजारांची रोकड लंपास!

82

बांदा : पाडलोस माडाचे गाळू येथील रामराज अनंतराव प्रभूपार्सेकर यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्याने फोडून रोख १ लाख १० हजार रुपये लंपास केला. प्रभूपार्सेकर यांच्या मुलग्याने रविवारी बागायतीला खत घालण्यासाठी ही रोकड आणून ठेवली होती. आज प्रभूपार्सेकर व त्यांच्या पत्नी घरी आल्या नंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रामराज प्रभूपार्सेकर यांनी आज सायंकाळी उशिरा बांदा पोलीसात फिर्याद दिली.
त्यानंतर बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. खोलीतील कपाटातील लॉकर फोडून आतील रोकड लंपास केली. तसेच लॉकरमधील नकली बांगड्याही चोरुन नेल्या.
सावंतवाडी डिवायएसपी संध्या गावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. अज्ञात चोरटा स्थानिक व माहितगार असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. अज्ञात चोरट्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.