मुंबई : गेले दोन आठवडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर कोकणासह विदर्भ, मराठवाडा आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे. परिणामी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास उशीर होत असल्याचं चित्र आहे. याशिवाय पीक विम्याचा ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारने पीक विमा भरण्यासाठीची मुदत येत्या तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या निर्णयामुळं राज्यातील शेतकऱ्यांना आणखी चार दिवस पीकविमा भरण्यासाठीची मुदत मिळाली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठीची अंतिम मुदत आज म्हणजेच ३१ जुलै रोजी संपणार होती. परंतु अर्ज भरताना सतत ऑनलाईन अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांकडून डेडलाईट वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ३१ जुलै पूर्वी पेरणी पूर्ण होतात, त्यामुळे विम्याची मुदत वाढवता येणार नाही, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता राज्य सरकारकडून अचानक तीन दिवसांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारकडून केवळ एक रुपयात पीक विमा भरण्याची नवी योजना जारी करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही ऑनलाईन फॉर्म शेतकऱ्यांना भरता येतो.





