सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा गावात पंधरा दिवस सातत्याने बत्ती गुल होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून विज सातत्याने गायब होतं आहे. तर गेल्या दोन दिवसापासून गावात पूर्णपणे वीज गायब असल्याने येथील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी तसेच व्यावसायिक हैराण झाले आहेत. सातत्याने वीज गायब होतं असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास समस्या उद्भवत आहेत. तसेच व्यावसायिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानास होत आहे. यासंदर्भात वारंवार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष गोवेकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातार्डा गावात गेले पंधरा दिवस वीज सातत्याने ये-जा करीत आहे. तर गेल्या दोन-तीन दिवसापासून वीज पूर्णपणे गायब असल्यामुळे येथील वीज ग्राहकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष गोवेकर यांनी वेंगुर्ला येथील वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली. सातार्डा गावच्या वीज समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास येत्या १५ ऑगस्टला आपण गावकऱ्यांसमवेत उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी वेंगुर्ला येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आपण नवीनच पदभार स्वीकारला असून लवकरात लवकर आपली समस्या सोडवण्याचे आश्वासन श्री. गोवेकर यांना दिले आहे.




