वैभववाडी : तळेरे वैभववाडी व करुळ घाटात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याकडे आपण लक्ष देत नाही. घाटात मोठी दुर्घटना घडण्याची वाट पहात आहात का ? असा संतप्त सवाल विचारात दोन दिवसात स्थानिक पदाधिका-यांना विश्वासात घेऊन रस्त्यावर पडलेले खड्डे जेएसबी मटेरियलने
बुजविण्याचे काम सुरु करा. अशी सक्त सुचना आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता शिवनीवार यांना केली.
रायगड ईर्शाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी करुळ घाटाची पहाणी केली. यावेळी तहसिलदार दिप्ती देसाई, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, प्रमोद रावराणे,अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, सुधीर नकाशे,सज्जनकाका रावराणे, राजेंद्र राणे, विवेक रावराणे, प्राची तावडे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
घाटात कोसळणा-या दरडी व खराब झालेला रस्ता याची आमदार राणे यांनी पहाणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे प्रमोद रावराणे यांनी रस्त्याच्या दुरावस्थेला संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. जेव्हा रस्ता घाटात कोसळणा-या दरडी व खराब झालेला रस्ता याची आमदार राणे यांनी पहाणी केली.ज्यावेळी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असते त्यावेळी कोणीही अधिकारी फिरकत नाहीत. त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे होते. असा आरोप केला गेला.
यावेळी आमदार राणे म्हणाले, तळेरे ते गगनबावडा दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. तुमच्या निष्क्रीयतेमुळे लोकांना आम्हांला लोकप्रतिनिधी म्हणून तोंड दयावे लागते. घाटासाठी सुमारे २५० कोटींचा मोठा निधी मंजूर आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरु होईल. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे काम आपल्या सर्वांना माहीती आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाणही लक्ष ठेवून आहेत.
पावसाळ्यानंतर हा संपूर्ण रस्ता चांगला होईल. परंतु तोपर्यंत या पावसाळ्यात घाटमार्ग सुरळीत कसा चालु राहील यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. घाटात पावसाळ्यात दोन जेसीबी तयार ठेवा. म्हणजे दरड कोसळली तर तातडीने वाहातूक सुरळीत चालू ठेवता येईल. यासाठी शासनाचा पैसा वापरा तुमच्या खिशातील पैसे आम्ही मागत नाही. आम्ही समजावून सांगत आहोत पण समजावून सांगितलेले एकला नाही तर बुस्टर डोस काय दयायचा तेही आम्हांला माहीत आहे. असा सज्जड दमही
आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला.





