दहिबाव नळयोजना दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करा | आ. नितेश राणे यांचे नगरपंचायत प्रशासनाला आदेश..!

109

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या दहीबाव अन्नपूर्णा प्रादेशिक नळयोजना दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने द्यावा. देवगड जामसंडे भागातील पाणीपुरवठा सहा दिवस बंद आहे तो तातडीने सुरू होण्यासाठी अनुषंगिक असलेले सर्व उपाययोजना तात्काळ करावेत.शिरगाव प्रादेशिक नळयोजनेची दुरुस्ती तात्काळ करून देवगड जामसंडे शहराला दोन दिवसात पाणी पुरवठा सुरू करावा असे आदेश आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाला दिले आहेत.

देवगड जामसंडे शहराच्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात तातडीची बैठक आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात संपन्न झाली.

या बैठकीला नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्षा मिताली सावंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे,मजिपचे उपअभियंता राजेंद्र मेस्त्री, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी ,सर्व नगरसेवक नगरसेविका आदी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी पाणी पुरवठा सहा सहा दिवस बंद का आहे.याबाबतचा सविस्तर आढावा घेतला, गेले २३ दिवस शिरगाव पाडाघर योजनेतुन न होऊ शकलेला पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा,पाईपलाईन सतत होणारी गळती, नादुरुस्त पाईपलाईन मुळे पंपिंग न होणे या समस्या कायम उदभवत आहे . हे या बैठकीत उघड झाले . शिरगाव पाडाघर रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नळयोजनेची पाईपलाईन फोडून टाकल्याने टेंबवलीच्या पुढे एअर आल्याने पाणी येत नसल्याची माहिती ठेकेदार बिपिन कोरगावकर याने सभागृहात दिली. हा बिघाड दोन दिवसात काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश आमदार नितेश राणे यांनी दिले.यावेळी ठेकेदार बिपीन कोरगावकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये आपला कामाचा ठेका संपला असून त्याला पुढील वाढ दिलेली नाही.यावर आमदार राणे यांनी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना याबाबत कल्पना दिली व सोमवारी संबंधित ठेकेदार यांचेबरोबर बैठक लावावी.अशी सूचना केली.

दहीबाव तळेबाजार सिंगल लाईन एक्सप्रेस फिडर टाकण्यात यावा अशी मागणी नगरसेवक निवृत्ती तथा बुवा तारी यांनी केली. तसेच या योजनेच्या सर्व दुरुस्ती करण्यासाठी चार कोटीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव पुढील दोन दिवसात मंत्रालय पातळीवर पाठवावा. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत प्रशासनाला केली आहे.