सावंतवाडी : एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदलीमुळे ब-याचशा प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत त्याचबरोबर माध्यमिक शाळांतील घटती पटसंख्या, संचमान्यतेचे निकष यामुळे जिल्ह्यातील बहुतांश माध्यमिक शाळांमध्ये गणित,विज्ञान इंग्रजी यासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी तसेच अन्य विषयांच्या अध्यापनासाठी कायमस्वरूपी विषय शिक्षक उपलब्ध नसल्याने माध्यमिक शाळा अडचणीत आल्या आहेत.
2012 सालापासून माध्यमिक शाळांमध्ये रिक्त झालेल्या शिक्षकांच्या पदभारतीला शासनाची मान्यता नसल्याने माध्यमिक शाळांतील शिक्षण प्रक्रिया खिळखिळी झाल्याची खंत शिक्षण क्षेत्रातील अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. काही शाळांमध्ये आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी एक किंवा दोनच शिक्षक कार्यरत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. याचा विपरीत परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून शाळा व संस्थांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.म्हणून अनेक शाळा व संस्थांनी स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपात अशा रिक्त जागांवर शिक्षक नेमले आहेत. मात्र असे शिक्षक कायमस्वरूपी नसल्याने शैक्षणिक कामकाज चालवणे गैरसोयीचे ठरत आहे.
विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक या शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अतिरिक्त शिक्षक ही समस्या डोकेदुखी ठरत आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग सारख्या डोंगरी व ग्रामीण जिल्ह्याला डोंगरी पटसंख्येचे निकष तातडीने लावून शिक्षण क्षेत्राला ऊर्जितावस्था देणे गरजेचे आहे. इयत्ता पाचवी मध्ये 21 विद्यार्थी संख्या असेल तर या इयत्तेसाठी एक स्वतंत्र शिक्षक. मात्र ही पटसंख्या 1 ते 19 असेल तर या इयत्तेसाठी एकही शिक्षक नाही हा पटसंख्येचा निकष अनाकलनीय व आडमुठा वाटतो. या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा व येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता जर एखाद्या शाळेत पाचवीची पटसंख्या कमी झाली तर तेथील कार्यरत शिक्षकाला अतिरिक्त ठरवणे म्हणजे गरीब शेतकरी व कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच प्रकार नव्हे का? असा संतप्त सूर जनमानसातून उठत आहे.
ग्रामीण भागातील लोकांचे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते आकर्षण इ.कारणांमुळे शाळांची घटती पटसंख्या पाहता इयत्ता पाचवीसाठी हा पटसंख्येचा निकष 10 विद्यार्थी संख्येच्या खाली आणणे आवश्यक आहे. यासाठी पालक, संस्थाचालक व शिक्षणप्रेमी यांनी व्यापक जनआंदोलन उभारणे गरजेचे आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक संघटनेच्या वतीने कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्गचे सुपूत्र असणा-या विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी पटसंख्येच्या या जाचक व शिक्षणव्यवस्थेला खिळखिळ्या करणा-या निकषांबाबत, माध्यमिक शाळांमध्ये विषयांनुरूप शिक्षक उपलब्ध करण्याच्या धोरणाबाबत गांभिर्याने विचार करून ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक संघटनेच्या वतीने कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत यांनी केली आहे.





