एकनाथ शिंदेंचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्री ?

194

मुंबई : अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. परंतु या भूकंपाचे हादरे असे सहजासहजी थांबणारे नाहीत. आणखी पुढे मोठमोठे धक्के राज्याला सहन करावे लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. भाजपचा नवा फॉर्म्युला आधीच ठरल्याचं समोर येतंय.

भाजपला हवंय खंबीर नेतृत्व –

भाजपला राज्यात एक सक्षम मराठा नेतृत्व पाहिजे. त्यासाठी मागच्या काही वर्षांपासून भाजपचा शोध सुरु होता. एकनाथ शिंदे आले मात्र ते भाजपच्या अपेक्षांना पुरले नाहीत, असं दिसून येतंय.

एकनाथ शिंदेंच्या पूर्वीपासूनच अजित पवार भाजपमध्ये जातील, अशा चर्चा व्हायच्या. परंतु प्रत्येकवेळी ‘त्या वावड्या होत्या’ असं अजित पवार सांगायचे. आता मात्र भाजपला अजित पवारांच्या रुपाने तगडं नेतृत्व मिळालं आहे.

देवेंद्र फडणवीसांचं काय होणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमध्ये सध्या काय सुरुय, याचा अंदाज बांधला तर दिल्लीश्वर त्यांच्यावर फारसे खूश आहेत, असं दिसत नाहीत. पक्षांतर्गत नाराजी, २०१९मध्ये स्वबळावर सत्ता आणण्यात आलेलं अपयश, पहाटेचा अयशस्वी शपथविधी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आलेलं अपयश; त्यामुळे मोदी-शाह त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येतं. म्हणूनच शिंदेंचं बंड यशस्वी करुनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नव्हतं.

भाजपने मोठ्या अपेक्षेने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शिवसेना नावाचा तगडा पक्ष मिळावा यासाठी हवी-नको ती मदत केली. परंतु भाजपला शिंदेंमध्ये ते नेतृत्व दिसलं नाही जे त्यांना हवंय.

फडणवीसांवर नाराजी, शिंदेंचं अपयश त्यामुळे भाजपला नव्या नेत्याचा शोध होताच. शिवाय तो नेता मराठाच पाहिजे होता. परंतु आता देवेंद्र फडणवीसांचं काय? असा प्रश्न पडतोच. फडणवीसांना केंद्रात जबाबदारी मिळेल, असं नवं समीकरण चर्चिलं जात आहे