शिवसेनेने रोखले बांदा येथील उड्डाणपुलाचे काम | ग्रामस्थांशी चर्चा करून काम सुरू करण्याची मागणी…

50

बांदा : स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता बांदा उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याचा आरोप करत आज शिवसेनेने ते काम बंद पाडले. यावेळी आपला उड्डाणपुलाला विरोध नाही. मात्र स्थानिकांच्या मागण्या आणि सूचना लक्षात घेऊन पुढील काम करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केली. यावेळी जोपर्यंत स्थानिकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. बांदा उड्डाणंपुलाच्या कामास गेल्या सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. सध्या महामार्गावर पिलर टाकण्यासाठी खोदाई सुरु करण्यात आली आहे.

याबाबत स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर साईप्रसाद काणेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख भय्या गोवेकर, नितेश पेडणेकर, हेमंत दाभोलकर, मिलिंद सावंत यांनी घटनास्थळी येत ठेकेदार यांना जाब विचारला. मात्र यावेळी उड्डाणंपूलाचा बदललेला आराखडा स्थानिक प्रशासनाला न देता तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता कोणाच्या परवानगीने काम सुरु केले असा सवाल उपस्थित केला. बदललेल्या आराखड्यानुसार पिलरची संख्या, पाणी निचाऱ्याचे व्यवस्थापन, बाजूपट्टीकडे वाहणाऱ्या नाल्याचे नियोजन याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना देण्यात न आल्याने काणेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबतचा आराखडा सरपंच यांना दिल्याचे ठेकेदार यांनी सांगितले. यावर काणेकर आक्रमक होत याबाबत संयुक्त बैठक तात्काळ घेण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा ईशारा दिला