“सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर यशोशिखर गाठता येते – पोलीस उपनिरीक्षक श्री.आनंद यशवंते

197

कलंबिस्त हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

सावंतवाडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च‌‌‌ 2023 मध्ये प्रशालेतील गुणानूक्रमे उत्तीर्ण
झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. आनंद यशवंते, संस्था अध्यक्ष श्री. शिवाजीराव सावंत, सचिव श्री. यशवंत राऊळ, सहसचिव श्री.चंद्रकांत राणे, संचालक श्री.सुरेश राऊळ, श्री. वसंत सावंत, श्री.शशिकांत धोंड, मुख्याध्यापक अभिजीत जाधव,वेर्लेचे माजी सरपंच श्री. सुभाष राऊळ, श्री.शाहू पास्ते, पोलीस कॉन्स्टेबल सावंत, महिला पोलीस कॉन्स्टेबल देसाई, होमगार्ड सावंत व वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक – कु. श्रृती प्रसाद कुडतरकर (९२.४०%) द्वितीय क्रमांक- कु. करिष्मा राजेश पास्ते (९२.२०%) तृतीय क्रमांक- मधुकर महेश पास्ते(९१.६०%) इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळवणारी कु.दीक्षा रामचंद्र देसाई या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवर व प्रमुख अतिथींच्या हस्ते ठेवीदार व देणगीदार दिलेल्या रोख रक्कमेची पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक यशवंते यांनी कलंबिस्त हायस्कूलच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल गौरवोद्गार काढले व स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी व आत्मविश्वास या गुणांची गरज असल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे आभार मानले. संस्था अध्यक्ष शिवाजीराव सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले.