कणकवली नगरपंचायतच्या कारवाई नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा विक्रेत्यांनी थाटली रस्त्यावर दुकाने

132

वाहतूक कोंडी दूर करण्याचे होणारे प्रयत्न ठरताहेत अयशस्वी.!

रिक्षा व्यवसायिकही सर्व्हिस रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा लावून सर्विस रस्त्यावर | आरटीओचे मात्र रस्ता सुरक्षिततेकडे दुर्लक्षच

कणकवली : शहरातील बाजारपेठ रस्त्यावर तसेच मुख्य रस्त्यावर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत काल कणकवली नगरपंचायतच्या पथकाने अचानक हटाव मोहीम राबवत कारवाई केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत कणकवली पटवर्धन चौक ते झेंडा चौकापर्यंत रस्त्यावर लावलेली दुकाने हटविण्यात आली होती. तर सर्विस रस्त्यावरीलही काही दुकानांना हटवत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी काहींचा माल जप्त करण्यात आला होता. कारण रस्त्यावर दुकाने मांडत असल्याने कणकवली बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. मात्र याबाबत विक्रेत्यांना सूचना देऊन देखील कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार नगरपंचायत पथकाकडून ही कारवाई करण्यात आली होती. मात्र काल करण्यात आलेल्या कारवाईला केराची टोपली दाखवत विक्रेत्यांनी पुन्हा आज रस्त्यावर आपली दुकाने थाटली आहेत. तसेच काही विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूने दुकानांची तोंड केल्यानं वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करून भाजी, फळ, फुले खरेदी करतात. याचा फटका मागून येणाऱ्या वाहनाना बसतो.

तसेच मुख्य प्रश्न बनलेला आहे तो म्हणजे कणकवली शहरात असलेल्या रिक्षा स्टॅण्ड. काही ठराविक ठिकाणी असलेली रिक्षा स्टॅण्ड ही शिस्तबद्द पार्किंग व्यवस्थेत आहेत. मात्र कणकवली पटवर्धन चौक ते बसस्थानक दरम्यान असलेली रिक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार्किंग न करता सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूना रिक्षा, मॅजिक सीटर उभ्या केल्या जातात. यामुळे कणकवली बसस्थानकातून बस बाहेर येताना देखील बस चालकांना मोठी कसरत करावी लागते. या प्रकाराकडे स्थानिक पोलिसांचाही दुर्लक्ष झाला आहे. बस अनेक वेळा बाहेर पडताना अनेकवेळा छोट – मोठे अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस, RTO चे जबाबदार अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या प्रकाराकडे लक्ष देऊन रिक्षा व्यवसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देतील का असा प्रश्न सर्वसामान्य वाहनचालकांमधून उपस्थित होत आहे.

तसेच हायवे प्राधिकरणाच्या माध्यमातून ओव्हर ब्रिज खालील स्टॉल धारकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर स्टॉल धारकांना पर्याय जागा देण्यात येणार असल्याचे काही राजकीय पक्षाच्या जबाबदार लोकप्रतिनिधी तसेच पुढार्‍यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही काही महिने उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची जागा व्यावसायिकांना उपलब्ध करून न दिल्यामुळे हे व्यवसायिक पुन्हा पुन्हा कारवाई करून देखील रस्त्यावर उतरत असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात येत आहे. मात्र जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.